नीरा-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात : पादचारी गंभीर जखमी!


निरा : प्रतिनिधी

            निरा-मोरगाव रोडवर अपघातांची मालिका सुरूच असून आज (दि. २९) सायंकाळी नऊच्या सुमारास घडलेला अपघात संपूर्ण परिसराला हादरवून गेला. कोळीवस्ती येथील बबन कोंडीबा मोटे (वय ६०) हे रस्त्याच्या कडेला चालत निघाले होते. मात्र निरेहून मोरगावकडे वेगात धावणाऱ्या.    (  एम एच ०४ केएफ ३३४५ ) क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.


            धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि दुर्दैवाने ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यांच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ भयभीत झाले. आक्रोश, गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी तातडीने बबन मोटे यांना उचलून प्रथम निरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले, त्यानंतर लोणंद येथे हलविले. परंतु उपचार न मिळाल्याने शेवटी त्यांना गंभीर अवस्थेत बारामती येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांचा मृत्यूशी जीवघेणा संघर्ष सुरू आहे.



अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही युवकांनी धाडस दाखवत त्याचा एक किलोमीटर पाठलाग केला आणि पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.


या रस्त्यावरील अपघातांचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. काही वर्षांपूर्वीच डांबरीकरण झालेले असले तरी काही महिन्यांतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात वाढलेली हायवा ट्रकची वाढती वाहतूक, अपुरी देखभाल आणि बेजबाबदार प्रशासनामुळे निरा-मोरगाव रोड आज अक्षरशः “मृत्यूचा सापळा” बनला आहे. गेल्या वर्षभरात अनेकांनी या रस्त्यावर आपले प्राण गमावले आहेत तर अनेक कायमचे अपंगत्वाला बळी पडले आहेत.


ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरवस्थेविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या, जागोजागी स्पीड ब्रेकरच्या मागण्या केल्या; मात्र संबंधित विभागाने याकडे कानाडोळा केला. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून लवकरच मोठ्या आंदोलनाची चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे.


पुढील तपास नीरा पोलिस स्टेशनकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments